सारे शिकुया ,पुढे जाऊया , प्रगत महाराष्ट्र घडवूया


Wednesday, 12 April 2023

अळसुंदेकरांनी केली महात्मा फुलेंच्या कार्यास अनुरूप जयंती साजरी

अळसुंदेकरांनी केली महात्मा फुलेंच्या कार्यास अनुरूप जयंती साजरी






  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देमनवाडी येथे आज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .यावेळी महात्मा फुले प्रतिष्ठान अळसुंदे यांच्या वतीने शाळेतील सर्व मुलांना वही व पेनचे वाटप करण्यात आले .यावेळी ग्रामपंचायत अळसुंदेचे सरपंच सन्माननीय जिजाबापू अनारसे तसेच ग्रामपंचायतचे मार्गदर्शक सन्माननीय रमेश दादा अनारसे, अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले भानुदास गार्डी सर, तसेच शाळेचे एक हक्काचे मदतकेंद्र व वाडीतील पहिले अधिकारी प्रमोद देवकाते साहेब तसेच महात्मा फुले प्रतिष्ठानचे सर्व मुख्य कार्यकर्ते अतुल अनारसे , सोमनाथ अनारसे ,शरद अनारसे ,सावता अनारसे यांच्या हस्ते वही व पेनचे वाटप करण्यात आले .यावेळी शाळेतील मुलांनी  आपल्या भाषणांतून महात्मा फुले यांच्या कार्याची माहिती सादर केली.शाळेतील सहशिक्षिका श्रीमती विजया रंधवे यांनी क्रांतीबा राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या जीवन कार्याचा सविस्तर जीवनवृत्तांत सोप्या भाषेत समजून सांगितला. उत्सव समितीचे अध्यक्ष रमेशदादा अनारसे यांनी महात्मा फुले जयंतीच्या निमित्ताने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देऊन फुलेंच्या कार्यास अनुरूप असे समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले ते सांगितले यामध्ये अळसुंदे ग्रामपंचायत च्या अंतर्गत येणाऱ्या पाच जिल्हा परिषदेच्या व एक हायस्कूल  अशा सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना वह्या व पेन तसेच, सर्व अंगणवाड्यातील मुलांना बिस्कीट पुढे देण्यात आले, संध्याकाळी पारंपरिक वाद्यांनी प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येऊन संध्याकाळी 7 ते 9 अंबाजोगाई येथील सुप्रसिद्ध व्याख्याते  अविनाश भारती यांचे प्रबोधनपर व्याख्यान आयोजित करून  राष्ट्रपिता तात्यासाहेब फुलेंच्या कार्याची माहिती समस्त ग्रामस्थांना देण्यात येणार आहे. यावेळी भानुदास गार्डी सर , प्रमोद देवकाते साहेब ,सरपंच  जिजाबापू अनारसे यांनी शालेय परिसर व गुणवंत विद्यार्थी  पाहून समाधान व्यक्त केले .शाळेतील दोन्ही शिक्षकांचे कौतुक व अभिनंदन उपस्थित सर्वांनी आपल्या मनोगतातून करून महात्मा फुलेंच्या कार्यास अभिवादन केले .शेवटी मुख्याध्यापक रविंद्र राऊत सर यांनी आभार प्रदर्शन करून जयंती कार्यक्रमाचा समारोप केला. 

Friday, 27 January 2023

देमनवाडी शाळेविषयी प्रातिनिधिक प्रतिक्रिया

 ... देमनवाडीतील माजी विद्यार्थ्याची प्रतिक्रिया....👇

*देमनवाडीतील प्राथमिक शाळा राऊत सरांच्या मार्गदर्शनाखाली कात टाकत आहे*


*निसर्गप्रेमी सुरेश पालवे* 


               देमनवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अतिशय दुर्गम भागातील  माळरानवरची ही शाळा. या देमनवाडीमध्ये कधीच एसटी येत नाही  किंवा  कधीच न्यूज पेपर भेटत नाही. देमनवाडीचा कर्जत तालुक्यातील घडामोडी मध्ये कधी उल्लेखकही होत नाही. कर्जत तालुक्यातील  खूप कमी लोकांच्या  परिचयाची असणारी ही देमनवाडी.  एखाद्या शिक्षकाला शिक्षा द्यायची म्हणजे त्या  शिक्षकाची बदली करून देमनवाडीला पाठवणे   असा प्रकार समजला जायचा. पण कार्य करण्याची हिंमत, धमक व जिद्द  आणि नाविन्याचा दृष्टिकोन असला की कोणतेही कार्य, कुठे गेले तरी खूप सहज आणि सोपे होऊन जाते. त्याचे एक उत्तम आदर्श उदाहरण म्हणजे देमनवाडी जिल्हा प्राथमिक शाळेतील राऊत सर व राऊत मॅडम.

        आदरणीय राऊत सरांच्या मार्गदर्शनाखाली देमनवाडीतील प्राथमिक शाळा कात टाकत आहे. राऊत सर देमनवाडीतील मुलांना  बदलत्या जागतिकीकरणाचे नवे धडे देत आहेत. ग्रामीण भागातील व दुर्गम भागातील ही मुले असली तरी त्यांची आधुनिकतेशी नाळ जुळवत आहेत. हे लहान लहान मुलं खरं तर त्यांना शिकवण म्हणजे तारेवरची कसरत असते. कष्टकरी, गोरगरीब व अठरा विश्व दारिद्र्य असणाऱ्या मुलांच्या आई-वडिलांकडे मुलांना लक्ष द्यायला वेळ नसतो. किंवा मुलांच्या आरोग्याची व शिक्षणाची त्यांना जास्त जाणीव नसते. या सर्वांमध्ये राऊत सरांनी वेगळेपणा जपला आहे.  हे लहान मुलं कुठून येतात, त्यांच्या घरची परिस्थिती कशी आहे, त्यांचे आई वडील अडाणी आहेत का शिक्षित आहेत, या सर्व गोष्टींचा बारीक अभ्यास करून  राऊत सर प्रत्येक मुलाला मायेने, आपुलकीने आणि जिव्हाळ्याने ज्ञानाचे अमृत पाजत आहेत, मुलांना विज्ञानवादी बनवत आहेत. त्यांना सुसंस्कारीक बनवीत आहेत.    देमनवाडी  मध्ये दळणवळणाची जास्त सोयी नसल्यामुळे येथील मुलं इंग्लिश शाळेमध्ये  आई वडील घालू शकत नाहीत. किंवा काही कुटुंबांची तशी परिस्थिती नाही. मग ही मुलं अतिशय जलद धावत्या  विज्ञान युगातील काळाशी  स्पर्धा कशी करतील ? पण या चिंतेला राउत सारांनी पूर्णविराम दिला आहे.

               मुलाचे पाय पाळण्यात दिसतात पण त्या मुलाला एक दिशा देण्याचे काम त्याचे गुरू करत असतात. मुलगा पुढे काय बनणार, कोण होणार, कोणत्या लेवला जाऊन पोहोचणार, हे सर्व त्याच्या प्राथमिक  पायावरती म्हणजे प्राथमिक शिक्षणावर  अवलंबून असते. तोच पाया राऊत सर अतिशय भक्कम मजबूत आणि उत्कृष्ट बनवत आहेत. जेव्हा देमनवाडी शाळेतील लहान लहान मुले   इंग्लिशचे धडे वाचतात, लिहितात तेव्हा आम्हाला त्याचे कौतुक वाटते. लहान मुलांचे कॉम्प्युटरचे ज्ञान किंवा त्यांची गणिताची आकडेमोड पाहून राऊत सर या मुलांना भविष्यातील फक्त डॉक्टर, इंजिनिअरच बनविणार नाहीत, तर ही मुलं भविष्यामध्ये अतिशय मजबूत शैक्षणिक, राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि वैज्ञानिक क्षेत्रात  भरीव योगदान देशासाठी देतील असे वाटते.  कारण लहान मुले हे मातीच्या गोळ्याप्रमाणे असतात, त्यांना जसा आकार देतील, तसे ते घडत जातात. या लहान मुलांना उत्कृष्ट  आकार देण्याचे काम राऊत सर  करत आहेत.  देमनवाडीतील  शेतकऱ्याची मजुराची शेळ्या मागे फिरणारे किंवा ऊस तोडीवर जाणाऱ्या आई-वडिलांची मुलं असली तरी, आज या लहान मुलांना  शास्त्रज्ञ होण्याची,  IAS  होण्याची व पायलट होण्याची स्वप्न पडत आहेत. याचे सर्व श्रेय राऊत सरांना जात आहे.

             देमनवडीतील प्राथमिक शाळेमध्ये शिकणारी ही लहान मुलं,  गोरगरिबांची मुलं, शेतकऱ्यांची मुलं, मेंढपाळाची मुलं व कामगारांची मुलं, इंग्लिश मीडियम मध्ये शिकणाऱ्या मुलांन इतकीच   चाणक्ष  व बुद्धिमान वाटतात.  अशावेळी राऊत सरांचे    आभार मानावे तेवढे कमीच आहे. गावातील गट तटाचे राजकारण असो. किंवा एकमेकांचे वैयक्तिक दुश्मनी असो या सगळ्यांपासून  राऊत सरांनी प्राथमिक शाळेला अलिप्त ठेवल आहे आणि  सर्वांबरोबर एक स्नेहाचे व जिव्हाळ्याचे संबंध जोपासले आहेत. देमनवाडीतील उद्योजक, सुशिक्षित आणि नोकरदार तरुणांना एकत्रित करून या शाळेचा विकास कसा करता येईल याचे नियोजन सर अतिशय उत्तम प्रकारे करत आहेत. वेगवेगळ्या स्वभावाची लोक, वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक, कसे हाताळायचे याचे उत्तम कौशल्य राउत सरांकडे आहे. ही शाळा माझी आहे या शाळेतील मुले माझे आहेत, या निस्वार्थ भावनेतून सरांनी या देमनवाडीतील प्राथमिक शाळेचे आपलेपण जपले आहे. 

                अतिशय दुर्गम भागातील माळरानावरती असणाऱ्या दमणवाडीचे सुदैव म्हणजे... या शाळेला आतापर्यंत खूप चांगल्या, प्रामाणिक व ग्रामीण भागातील मुलांविषयी तळमळ असणाऱ्या शिक्षकांची परंपरा लाभली आहे. मला आठवते त्याप्रमाणे मेडे गुरुजींनी देमनवाडी मध्ये आदर्श शिक्षणाचा पाया रचला. त्यानंतर अडसूळ सर, सरोदे सर, पवार सर, डहाळे सर व घोडके  सर या शिक्षकांनी या पायावरती  ज्ञान  मंदिर व शिखर बांधून त्याच्यावरती  यशाचा कळस चढविला आहे.  अता राऊत सर व  राउत मॅडम या जोडीने ह्या कळसावरती एक यशाचा, प्रगतीचा, आदर्शचा व गुणवत्तेचा झेंडा  फडकविला  आहे. शेळ्या- मेंढ्या, शेती आणि ऊस तोडीच्या पलीकडे येथील मुलांना शिक्षणाची काहीच किंमत माहित नव्हती. यांनी येथील मुलं घडवली शेळ्या मेंढ्या मागे, गाई म्हशी मागे फिरणारे मुले  शाळेत आणली. त्यांना घडविले, वाढविले, ज्ञानाच अमृत पाजले, विज्ञानवादी विचाराचे बळ त्यांच्या पंखामध्ये भरले, महापुरुषांचे आदर्श त्यांच्या मनामध्ये रुजविले, स्वातंत्र्यवीरांचे, क्रांतिवीरांचे व देशभक्तीचे महत्व त्यांना  सांगतले. आरोग्याचे महत्व खेळाचे महत्व व्यायामाचे महत्त्व त्यांना पटवून दिले .  म्हणूनच आज देमनवाडीतील मुले विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्यकर्तुत्वाची चूक दाखवत आहे. शैक्षणिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र, इंजिनिअरिंग व IT क्षेत्र, प्रशासकीय क्षेत्र व उद्योजक क्षेत्रामध्ये आपलं कार्यकर्तृत्व सिद्ध करत आहेत.  ह्या सगळ्या यशाचे श्रेय देमनवाडीतील प्राथमिक शाळेमध्ये मुलांना घडवणाऱ्या शिक्षकांना जाते. 

                  देमनवाडी प्राथमिक शाळा ही फक्त शाळा नसून एक ज्ञानमंदिर झाले आहे. माळरानावरती चार भिंतीमध्ये सुरू झालेली ही शाळा, आज एक कुंजविहार प्रमाणे हसते खेळते निसर्गातील ज्ञानमंदिर तयार झाले आहे.  या ज्ञान मंदिरात  ही छोटी मुलं सुसंस्कारीक होत आहेत, सज्ञान होत आहेत, गुणवान होत आहेत, चाणक्ष  व बुद्धिमान होत आहेत म्हणजे या मुलांचा सर्वांगीण विकास होत आहे. या सर्व गोष्टीचे श्रेय या घडीला तरी आदरणीय राऊत सरांना जात आहे. कारण त्यांचे निस्वार्थीपणे असणारे अखंड कष्ट व भारताचे  भविष्य उज्वल होण्यासाठी  नवीन पिढी घडवण्याची जिद्द आणि चिकाटी मुळे हे सर्व शक्य होत आहे....!

.

. *आपलाच एक माजी विद्यार्थी निसर्गप्रेमी सुरेश*

Tuesday, 3 January 2023

ज्ञानज्योती ,क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती मोठ्या उत्साहात संपन्न

 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देमनवाडी येथे ज्ञानज्योति, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या 192 व्या जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात माईंना अभिवादन करण्यात आले . यावेळी सावित्रीच्या लेकींनी त्यांना अभिवादन करून त्यांच्या कार्याचा गौरव केला व आदरभाव व्यक्त केला. याप्रसंगी शाळेतील मुलांनी , मुलींनी माईंच्या कार्याविषयी विचार व्यक्त केले .तसेच सौ.मोहिनी प्रमोद देवकाते यांनी क्रांतीज्योतींच्या कार्याची सविस्तर माहिती उपस्थित सर्वांना दिली व कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी सौ.नीता भारत देवकाते , अंगणवाडी ताई सौ.चंद्रकला पालवे , सौ.प्रतिभा शेजाळ देवकाते यांनी उपस्थित राहून माईंना अभिवादन करून फुले व पुष्पहार अर्पण केला. शेवटी मुख्याध्यापक श्री रविंद्र राऊत यांनी माईंचे कार्य व आजची गरज याविषयी सांगून खऱ्या अर्थाने जयंती साजरी करायची असेल तर त्यांनी दिलेला वसा व विचार अर्थात शिक्षण सर्वांनी मनापासून घेण्याची गरज सांगितली ...

Friday, 23 December 2022

दप्तरमुक्त शनिवार नि आमुच्या गंमती जंमतीतुन अमुचा अभ्यास


 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देमनवाडी येथे आज दिनांक 24/12/2022 रोजी दप्तरमुक्त शनिवार अंतर्गत मुक्त हालचाली , योगासने , सूर्यनमस्कार , त्यातच शेवटी शवासन करून रिलॅक्स मध्ये झोपलेल्या स्थितीत चिंतनात पहिली 1 ते 100 , दुसरी 100 ते 1 , 3 री व 4 थी पाढे सराव व नंतर त्याच स्थितीत वर्गानुसार एकेकाचे सादरीकरण एकेका ओळींचे , पाढ्याचे सादरीकरण केले . हा आज वेगळा अनुभव मुलांनी घेतला व त्यात त्यांना खूपच आनंद व वेगळेपण जाणवले .. 

Saturday, 22 October 2022

दिवाळीचा बौद्धिक फराळ




 दिवाळीचा बौद्धिक फराळ 

ऑक्टोबर ,नोव्हेंबर महिना आला की दिवाळीची सुट्टी कधी लागते याची सर्वांनाच उत्सुकता असते. दिवाळीचा हा सण घरात आनंदी, प्रसन्न व उत्साहाचे वातावरण तयार करतो.

 मित्रपरिवार, नातेवाईक यांच्या भेटीगाठी, चर्चा, त्याबरोबरच अनेक गोड व तिखट पदार्थांची चव चाखण्याचा आनंद काही वेगळाच असतो.

 दिवाळीच्या सुट्टीत मिळणाऱ्या वेळेत अजूनही एक फराळ करण्याची संधी मिळते आणि तो फराळ म्हणजे *बौद्धिक फराळ !*

 सुट्टीच्या या वेळेत अनेक चांगल्या लेखकांची विविध पुस्तके वाचून आपण आपली बौद्धिक व मानसिक    भूक भागवून विचारांची परिपक्वता वाढवू शकतो.

 मीही हा विचार करत असताना अचानक माझ्या हाती *" समर- लढा कोरोना विरुद्धचा ! "* हे गौतम कोतवाल लिखित पुस्तक पडले.

 ज्या अदृश्य कोरोनाने संपूर्ण जग वेठीस धरले, जागेवर थांबविले. त्या कोरोनारुपी शत्रूशी लढा देणाऱ्या प्रशासकीय, वैद्यकीय, पोलीस, राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या 30 कोरोना योद्धांच्या जीवनाविषयी व त्यांनी कोरोना काळात कोरोनाशी दोन हात करून समाजात माणुसकीचा आदर्श घालून देणाऱ्या त्यांच्या कार्याविषयीची माहिती या पुस्तकात वाचनास मिळाली.

 जेव्हा  माणूस आपले वैयक्तिक आयुष्य वाचविण्यासाठी घराबाहेर पडत नव्हता, आपल्या माणसांपासून  दूर पळत होता. त्याचवेळी काही माणसे जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य निष्ठेने बजावीत होते.

 कोरोनाच्या या भयानक परिस्थिती अनेक डॉक्टरांनी आपली वैद्यकीय सेवा काही काळ थांबविली, राजकारणी व्यक्ती अदृश्य झाल्या, प्रशासनातील लोकही जनसामान्यांपासून दूर गेले.

 अशा बिकटप्रसंगी त्यांच्याच क्षेत्रात काम करणारे काही मनुष्यरुपी देवत्व प्राप्त झालेले निवडक माणसे मात्र रस्त्यावर उतरली, माणसात मिसळी, मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून काम करीत राहिली.

 त्यात अनेक धाडसी व कर्तुत्वान महिलांचाही समावेश होता.व आपल्या कर्जतकरांसाठी भूषणाची बाब म्हणजे आपल्या कर्जतचे भूमिपुत्र असलेले कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री सुरेशकुमार राऊत ज्यांच्या कार्याने मा.उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व राज्याचे माजी गृहमंत्री मा.दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले व लोकशाही पुणेरत्न या सन्मानाने पुरस्कृत केले व केंद्रीय गृहमंत्री पदक नुकतेच जाहीर झालेल्या या सिंघम पोलीस अधिकाऱ्याच्या कार्याचाही गौरव या पुस्तकात पहावयास मिळतो. ही आपल्या कर्जतकरांसाठी मोठी भूषणास्पद बाब आहे.

 भुकेल्याला अन्न, तहानलेल्याला पाणी, घराकडे जाणाऱ्यांना निवारा, आजारी पडलेल्यांना वैद्यकीय मदत देताना या असामान्यत्व प्राप्त झालेल्यांना हे कार्य करण्यासाठी ईश्वरी वरदानच मिळाले असे म्हणावेसे वाटते.

 हे कोरोनायुद्धे रात्रंदिवस काम करत होते आपल्या घरच्यांपासून , मुलाबाळांपासून दूर राहून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांचा जीव वाचविण्यासाठी धडपडत होते.

 दिवाळीचा गोड फराळ करतानाच मनाला उभारी देणारा व आपण करत असलेल्या कामाला प्रेरणा देणारा बौद्धिक फराळ म्हणजे - पुस्तक वाचन !

  हा फराळ नक्कीच पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरेल. या सुट्टीच्या काळात पुस्तकांशी आपण मैत्री करू शकतो. यशस्वी लोकांची आत्मचरित्र, ऐतिहासिक कादंबऱ्या, प्रेरणादायी विचारांची पुस्तके, रंजक कथा , कवितासंग्रह यासारखी पुस्तके वाचून बौद्धिक फराळाचा आनंद लुटला तर प्रत्येकाला आपल्या क्षेत्रातील काम करण्यासाठी लागणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचा झरा निर्माण करता येईल.

 पैशाच्या संपत्तीने श्रीमंत होण्यापेक्षा विचारांच्या संपत्तीने श्रीमंत होऊन जीवन अधिक सुखकारक जगता येते.

 फक्त त्यासाठी वाचनाची गोडी आवड असावी आणि जर असेल तर ती जोपासता यायला हवी तसेच त्यातून एक आदर्शवत जीवनशैली ही निर्माण करता यावी जशी की मला  समर - लढा कोरोनाविरुद्धचा! या गौतम कोतवाल लिखित पुस्तकातील 30 कर्तृत्ववान व्यक्तींच्या जीवनातून समजून घेता आली.

 घरातील लहान मुलांना छोटी छोटी पुस्तके वाचनास दिली तर त्यातून  त्यांना अनेक गोष्टी शिकता येतील, महापुरुष समजून घेता येतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टीव्ही व मोबाईल पासून मुलांना दूर राहता येईल.

 मातीचा किल्ला व बांबूच्या कामट्यांचा आकाश कंदील, पणत्या ते तयार करायला शिकतील.

 असो ! चला , गोड फराळाबरोबरच बौद्धिक फराळाची थोडीशी चव चाखुया.

 जिभेसोबत मनाचाही लाड पुरवू या !


प्राचार्य श्री.चंद्रकांत राऊत

समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कर्जत

Friday, 14 October 2022

वाचनप्रेरणा दिन व आंतरराष्ट्रीय हात धुवा दिन देमनवाडी शाळेत उत्साहात संपन्न

 

आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देमनवाडी येथे मिसाईल मॅन भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचनप्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच आंतरराष्ट्रीय हात धुवा दिन ही साजरा करण्यात आला यानिमित्ताने शाळेतील सहकारी शिक्षिका श्रीमती विजया रंधवे मॅडम यांनी मुलांना डॉ.अब्दुल कलाम यांच्याविषयी माहिती सांगून वाचनाचे महत्व विशद केले तसेच स्वच्छतेचे महत्त्व सांगताना प्रत्यक्ष हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून ती कृती सर्व मुलांकडून करवून घेऊन नियमितपणे याप्रमाणे आपण हात धुतोच असे हात आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांनी धुवावेत हे पहावे व त्यांना ही कृती करून घेण्याविषयी सांगितले. अशाप्रकारे आज शाळेत दोन्ही महत्वाचे दिन साजरे करताना स्वयंपाकी मदतनीस ताई व माता पालक ही उपस्थित होत्या.

आदर्श शाळा देमनवाडी : ग्लोबलनगरी व्हिडीओ कॉन्फरन्स देमनवाडी येथील मुलां...

आदर्श शाळा देमनवाडी : ग्लोबलनगरी व्हिडीओ कॉन्फरन्स देमनवाडी येथील मुलां...: *न्यू जर्सी अमेरिका येथील ग्लोबल संघटनेचे अध्यक्ष किशोरदादा गोरे यांनी देमनवाडी शाळेतील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला..*  ...

Thursday, 13 October 2022

संगणक हाताळतो आम्ही




जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देमनवाडी मधील इयत्ता पहिलीतील मुलं संगणकावर संख्या टाइप करताना एकमेकांना सूचना करणे , चूक समजावून सांगणे , कर्सर खाली वर डावीकडे उजवीकडे घेणे ह्या बाबी छानपैकी ही मुलं करतात व मस्त आनंद घेतात ..

Monday, 10 October 2022

शाळाभेटीने भारावल्या विस्तार अधिकारी

आज दिनांक 10/10/2022 रोजी मा.विस्तार अधिकारी श्रीमती उज्वला गायकवाड मॅडम यांनी शाळेस भेट देऊन शाळेची सर्वांगीण तपासणी केली… सकाळी शाळेत प्रवेश केला असताना मुलांची नियमितपणे सुरू असलेली बालसभा त्यांच्या नजरेत भरली व तात्काळ मॅडमनी त्यात सहभाग घेऊन त्यांच्यातील एक होऊन त्यांच्या मतांना , विचारांना आणखी चालना देऊन सर्वांच्या सहभागाबद्दल खूपच कौतुक केले… यावेळी #मिशन_आपुलकी अंतर्गत सुरू असलेले रंगकाम पाहून मॅडम अतिशय प्रभावी झाल्या.. जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेली ही छोटीशी वाडी परंतु येथील तरुणाईने हाती घेतलेल्या ज्ञानमंदिराच्या कायापालटाचा वसा पाहून त्यांचे मन भरून आले. शाळेतील विविध उपक्रम तेही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीचे पाहून तर मनस्वी आनंदी झाल्या. शाळेतील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती विजया रंधवे मॅडम यांनी ह्या उपक्रमांची माहिती देतानाच शाळेतील हिरव्यागार वनराजींची प्रत्यक्ष माहिती दिली . प्रत्येल मूल हे कसं वेगळं आहे व त्याच्या विकासात येणाऱ्या अडचणी व त्यावर केलेली व करत असलेली मात ही सांगितली. शालेय पोषण आहार बनविणाऱ्या मदतनीस ताई सौ.अर्चना खामगळ यांचा त्यांच्या कामकाज व शालेय रंगकाम सहभाग बद्दल सत्कार केला या सत्काराने सौ.अर्चनाताई भारावून गेल्या.आज योगायोगाने इयत्ता तिसरीतील कु.कार्तिकीचा वाढदिवसाचा होता विस्तार अधिकारी गायकवाड मॅडम यांनी यावेळी या गुणी मुलीला फेटा बांधून व पुस्तक भेट देऊन तिला शुभेच्छा दिल्या. आज राष्ट्रीय जंतनाशक दिन असल्याने मुलांना जंतनाशकाच्या गोळ्यांचे वितरण करण्यात आले. तसेच,शाळेत सुमारे दीड लाख रुपयांची देणगी वस्तू रूपाने मिळत असलेली पाहून शाळा व्यवस्थापन समिती व शाळेचे मुख्याध्यापक श्री रविंद्र राऊत व शिक्षिका श्रीमती विजया रंधवे यांच्याविषयी गौरवोद्गार काढून पुढील कार्यासाठी शुभेच्छा व मार्गदर्शन करण्याचे आश्वासन देऊन शाळेच्या एकंदरीत कामकाजावर उत्कृष्ट असा शेरा दिला.