Saturday, 31 December 2022
Friday, 23 December 2022
दप्तरमुक्त शनिवार नि आमुच्या गंमती जंमतीतुन अमुचा अभ्यास
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देमनवाडी येथे आज दिनांक 24/12/2022 रोजी दप्तरमुक्त शनिवार अंतर्गत मुक्त हालचाली , योगासने , सूर्यनमस्कार , त्यातच शेवटी शवासन करून रिलॅक्स मध्ये झोपलेल्या स्थितीत चिंतनात पहिली 1 ते 100 , दुसरी 100 ते 1 , 3 री व 4 थी पाढे सराव व नंतर त्याच स्थितीत वर्गानुसार एकेकाचे सादरीकरण एकेका ओळींचे , पाढ्याचे सादरीकरण केले . हा आज वेगळा अनुभव मुलांनी घेतला व त्यात त्यांना खूपच आनंद व वेगळेपण जाणवले ..
Saturday, 22 October 2022
दिवाळीचा बौद्धिक फराळ
दिवाळीचा बौद्धिक फराळ
ऑक्टोबर ,नोव्हेंबर महिना आला की दिवाळीची सुट्टी कधी लागते याची सर्वांनाच उत्सुकता असते. दिवाळीचा हा सण घरात आनंदी, प्रसन्न व उत्साहाचे वातावरण तयार करतो.
मित्रपरिवार, नातेवाईक यांच्या भेटीगाठी, चर्चा, त्याबरोबरच अनेक गोड व तिखट पदार्थांची चव चाखण्याचा आनंद काही वेगळाच असतो.
दिवाळीच्या सुट्टीत मिळणाऱ्या वेळेत अजूनही एक फराळ करण्याची संधी मिळते आणि तो फराळ म्हणजे *बौद्धिक फराळ !*
सुट्टीच्या या वेळेत अनेक चांगल्या लेखकांची विविध पुस्तके वाचून आपण आपली बौद्धिक व मानसिक भूक भागवून विचारांची परिपक्वता वाढवू शकतो.
मीही हा विचार करत असताना अचानक माझ्या हाती *" समर- लढा कोरोना विरुद्धचा ! "* हे गौतम कोतवाल लिखित पुस्तक पडले.
ज्या अदृश्य कोरोनाने संपूर्ण जग वेठीस धरले, जागेवर थांबविले. त्या कोरोनारुपी शत्रूशी लढा देणाऱ्या प्रशासकीय, वैद्यकीय, पोलीस, राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या 30 कोरोना योद्धांच्या जीवनाविषयी व त्यांनी कोरोना काळात कोरोनाशी दोन हात करून समाजात माणुसकीचा आदर्श घालून देणाऱ्या त्यांच्या कार्याविषयीची माहिती या पुस्तकात वाचनास मिळाली.
जेव्हा माणूस आपले वैयक्तिक आयुष्य वाचविण्यासाठी घराबाहेर पडत नव्हता, आपल्या माणसांपासून दूर पळत होता. त्याचवेळी काही माणसे जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य निष्ठेने बजावीत होते.
कोरोनाच्या या भयानक परिस्थिती अनेक डॉक्टरांनी आपली वैद्यकीय सेवा काही काळ थांबविली, राजकारणी व्यक्ती अदृश्य झाल्या, प्रशासनातील लोकही जनसामान्यांपासून दूर गेले.
अशा बिकटप्रसंगी त्यांच्याच क्षेत्रात काम करणारे काही मनुष्यरुपी देवत्व प्राप्त झालेले निवडक माणसे मात्र रस्त्यावर उतरली, माणसात मिसळी, मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून काम करीत राहिली.
त्यात अनेक धाडसी व कर्तुत्वान महिलांचाही समावेश होता.व आपल्या कर्जतकरांसाठी भूषणाची बाब म्हणजे आपल्या कर्जतचे भूमिपुत्र असलेले कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री सुरेशकुमार राऊत ज्यांच्या कार्याने मा.उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व राज्याचे माजी गृहमंत्री मा.दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले व लोकशाही पुणेरत्न या सन्मानाने पुरस्कृत केले व केंद्रीय गृहमंत्री पदक नुकतेच जाहीर झालेल्या या सिंघम पोलीस अधिकाऱ्याच्या कार्याचाही गौरव या पुस्तकात पहावयास मिळतो. ही आपल्या कर्जतकरांसाठी मोठी भूषणास्पद बाब आहे.
भुकेल्याला अन्न, तहानलेल्याला पाणी, घराकडे जाणाऱ्यांना निवारा, आजारी पडलेल्यांना वैद्यकीय मदत देताना या असामान्यत्व प्राप्त झालेल्यांना हे कार्य करण्यासाठी ईश्वरी वरदानच मिळाले असे म्हणावेसे वाटते.
हे कोरोनायुद्धे रात्रंदिवस काम करत होते आपल्या घरच्यांपासून , मुलाबाळांपासून दूर राहून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांचा जीव वाचविण्यासाठी धडपडत होते.
दिवाळीचा गोड फराळ करतानाच मनाला उभारी देणारा व आपण करत असलेल्या कामाला प्रेरणा देणारा बौद्धिक फराळ म्हणजे - पुस्तक वाचन !
हा फराळ नक्कीच पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरेल. या सुट्टीच्या काळात पुस्तकांशी आपण मैत्री करू शकतो. यशस्वी लोकांची आत्मचरित्र, ऐतिहासिक कादंबऱ्या, प्रेरणादायी विचारांची पुस्तके, रंजक कथा , कवितासंग्रह यासारखी पुस्तके वाचून बौद्धिक फराळाचा आनंद लुटला तर प्रत्येकाला आपल्या क्षेत्रातील काम करण्यासाठी लागणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचा झरा निर्माण करता येईल.
पैशाच्या संपत्तीने श्रीमंत होण्यापेक्षा विचारांच्या संपत्तीने श्रीमंत होऊन जीवन अधिक सुखकारक जगता येते.
फक्त त्यासाठी वाचनाची गोडी आवड असावी आणि जर असेल तर ती जोपासता यायला हवी तसेच त्यातून एक आदर्शवत जीवनशैली ही निर्माण करता यावी जशी की मला समर - लढा कोरोनाविरुद्धचा! या गौतम कोतवाल लिखित पुस्तकातील 30 कर्तृत्ववान व्यक्तींच्या जीवनातून समजून घेता आली.
घरातील लहान मुलांना छोटी छोटी पुस्तके वाचनास दिली तर त्यातून त्यांना अनेक गोष्टी शिकता येतील, महापुरुष समजून घेता येतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टीव्ही व मोबाईल पासून मुलांना दूर राहता येईल.
मातीचा किल्ला व बांबूच्या कामट्यांचा आकाश कंदील, पणत्या ते तयार करायला शिकतील.
असो ! चला , गोड फराळाबरोबरच बौद्धिक फराळाची थोडीशी चव चाखुया.
जिभेसोबत मनाचाही लाड पुरवू या !
प्राचार्य श्री.चंद्रकांत राऊत
समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कर्जत
Friday, 14 October 2022
वाचनप्रेरणा दिन व आंतरराष्ट्रीय हात धुवा दिन देमनवाडी शाळेत उत्साहात संपन्न
आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देमनवाडी येथे मिसाईल मॅन भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचनप्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच आंतरराष्ट्रीय हात धुवा दिन ही साजरा करण्यात आला यानिमित्ताने शाळेतील सहकारी शिक्षिका श्रीमती विजया रंधवे मॅडम यांनी मुलांना डॉ.अब्दुल कलाम यांच्याविषयी माहिती सांगून वाचनाचे महत्व विशद केले तसेच स्वच्छतेचे महत्त्व सांगताना प्रत्यक्ष हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून ती कृती सर्व मुलांकडून करवून घेऊन नियमितपणे याप्रमाणे आपण हात धुतोच असे हात आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांनी धुवावेत हे पहावे व त्यांना ही कृती करून घेण्याविषयी सांगितले. अशाप्रकारे आज शाळेत दोन्ही महत्वाचे दिन साजरे करताना स्वयंपाकी मदतनीस ताई व माता पालक ही उपस्थित होत्या.
आदर्श शाळा देमनवाडी : ग्लोबलनगरी व्हिडीओ कॉन्फरन्स देमनवाडी येथील मुलां...
Thursday, 13 October 2022
संगणक हाताळतो आम्ही
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देमनवाडी मधील इयत्ता पहिलीतील मुलं संगणकावर संख्या टाइप करताना एकमेकांना सूचना करणे , चूक समजावून सांगणे , कर्सर खाली वर डावीकडे उजवीकडे घेणे ह्या बाबी छानपैकी ही मुलं करतात व मस्त आनंद घेतात ..
Monday, 10 October 2022
शाळाभेटीने भारावल्या विस्तार अधिकारी
आज दिनांक 10/10/2022 रोजी मा.विस्तार अधिकारी श्रीमती उज्वला गायकवाड मॅडम यांनी शाळेस भेट देऊन शाळेची सर्वांगीण तपासणी केली… सकाळी शाळेत प्रवेश केला असताना मुलांची नियमितपणे सुरू असलेली बालसभा त्यांच्या नजरेत भरली व तात्काळ मॅडमनी त्यात सहभाग घेऊन त्यांच्यातील एक होऊन त्यांच्या मतांना , विचारांना आणखी चालना देऊन सर्वांच्या सहभागाबद्दल खूपच कौतुक केले… यावेळी #मिशन_आपुलकी अंतर्गत सुरू असलेले रंगकाम पाहून मॅडम अतिशय प्रभावी झाल्या.. जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेली ही छोटीशी वाडी परंतु येथील तरुणाईने हाती घेतलेल्या ज्ञानमंदिराच्या कायापालटाचा वसा पाहून त्यांचे मन भरून आले. शाळेतील विविध उपक्रम तेही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीचे पाहून तर मनस्वी आनंदी झाल्या. शाळेतील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती विजया रंधवे मॅडम यांनी ह्या उपक्रमांची माहिती देतानाच शाळेतील हिरव्यागार वनराजींची प्रत्यक्ष माहिती दिली . प्रत्येल मूल हे कसं वेगळं आहे व त्याच्या विकासात येणाऱ्या अडचणी व त्यावर केलेली व करत असलेली मात ही सांगितली. शालेय पोषण आहार बनविणाऱ्या मदतनीस ताई सौ.अर्चना खामगळ यांचा त्यांच्या कामकाज व शालेय रंगकाम सहभाग बद्दल सत्कार केला या सत्काराने सौ.अर्चनाताई भारावून गेल्या.आज योगायोगाने इयत्ता तिसरीतील कु.कार्तिकीचा वाढदिवसाचा होता विस्तार अधिकारी गायकवाड मॅडम यांनी यावेळी या गुणी मुलीला फेटा बांधून व पुस्तक भेट देऊन तिला शुभेच्छा दिल्या. आज राष्ट्रीय जंतनाशक दिन असल्याने मुलांना जंतनाशकाच्या गोळ्यांचे वितरण करण्यात आले. तसेच,शाळेत सुमारे दीड लाख रुपयांची देणगी वस्तू रूपाने मिळत असलेली पाहून शाळा व्यवस्थापन समिती व शाळेचे मुख्याध्यापक श्री रविंद्र राऊत व शिक्षिका श्रीमती विजया रंधवे यांच्याविषयी गौरवोद्गार काढून पुढील कार्यासाठी शुभेच्छा व मार्गदर्शन करण्याचे आश्वासन देऊन शाळेच्या एकंदरीत कामकाजावर उत्कृष्ट असा शेरा दिला.
Sunday, 4 September 2022
#मिशन_आपुलकी 2022
'देमनवाडी शाळेत सोनियाचा दिनु आज उगवला'
आज दिनांक 03/09/2022 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देमनवाडी येथे शाळा व्यवस्थापन समितीची रचना करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व शंभर टक्के पालक यामध्ये महिलांचाही समावेश होता. यावेळी मुख्याध्यापक रविंद्र राऊत यांनी समितीच्या रचनेची माहिती पालक व ग्रामस्थांना दिली व शाळा व्यवस्थापन समिती पुनर्रचना करण्याचे आवाहन केले.यावेळी सर्व ग्रामस्थ व पालकांनी एकमुखाने शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी हनुमंत पालवे व उपाध्यक्षपदी प्रल्हाद देमुंडे यांची निवड केली.आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करून झालेल्या सभेत शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणात लोकसहभाग जमा करण्यात आला.यावेळी ग्रामपंचायत सदस्य भारतआबा देवकाते यांनी वडील स्व.उत्तम देवकाते यांच्या स्मरणार्थ शाळेसाठी वायरलेस साऊंड ट्रॉली देण्याचे कबूल केले , तसेच पंचायत समितीचे ब्लॉक मॅनेजर राहुल देमुंडे यांनी एक संगणक देण्याचे जाहीर केले , आळसुंदे सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन बापू देमुंडे यांनी कैलासवासी भागीरथीबाई देमुंडे यांच्या स्मरणार्थ प्रिंटर देण्याचे कबूल केले , आळसुंदे शाळेचे उपाध्यक्ष सोमनाथ पालवे यांनी देमनवाडी शाळेसाठी दोन मोठे व्हाईटबोर्ड देण्याचे कबूल केले , देमनवाडीतील पहिले अधिकारी कृषी अधिकारी प्रमोद देवकाते यांनी शाळेच्या दोन्ही खोल्यातील अंतर्गत भागांमध्ये शैक्षणिक रंगकाम करून देण्याची जबाबदारी उचलली, तसेच ग्रामपंचायत सदस्य कांतीलाल पालवे यांनी शाळेसाठी इन्व्हर्टर देण्याचे कबूल केले , गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर गणेश पालवे यांनी शाळेतील मुलांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचे R.O. फिल्टर देण्याचे कबूल केले, सतीश पालवे यांच्या कडून 10 खुर्च्या देण्याचे कबुल केले,आळसुंदे सेवा सोसायटीचे माजी संचालक प्रकाश पालवे व देमनवाडी शाळेचे नवनियुक्त उपाध्यक्ष प्रल्हाद देमुंडे यांनी शाळेसाठी एक अँड्रॉइड एलईडी टीव्ही देण्याचे कबूल केले .तसेच महादेव पालवे यांनी ध्वजस्तंभ उभारून देण्याची जबाबदारी स्विकारली.तसेच सतीश पालवे यांनी 10 खुर्च्या शाळेसाठी देण्याचे कबूल केले. कार्यक्रम वेळी आवश्यक मंडप व साउंड सिस्टीम सौजन्य कांदा व्यापारी बापू पालवे यांनी ही जबाबदारी स्वीकारली .तसेच या होणाऱ्या मोठ्या उत्सवपूर्ण कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवर व ग्रामस्थ व विद्यार्थी यासर्वांना सुग्रास असे स्नेहभोजन देवकाते परिवाराने देण्याचे जाहीर केले यामध्ये अजिनाथ देवकाते , माऊली देवकाते , शिवाजीराजे देवकाते व देवकाते परिवाराचे सर्व सदस्य उपस्थित होते .कार्यक्रम यशस्वितेसाठी सहकारी शिक्षिका श्रीमती विजया रंधवे यांनी परिश्रम घेतले. प्रा.आप्पासाहेब पालवे यांनी उपस्थितांचे आभार मानून शाळेच्या प्रगतीविषयी व दोन्ही शिक्षकांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी पत्रकार विष्णू देमुंडे , भाऊसाहेब देमुंडे ,बापू पालवे , धनंजय पालवे ,गोरख देवकाते ,गंगाराम पालवे ,माऊली देवकाते , अजिनाथ देवकाते , गणेश देमुंडे,यशवंत पालवे, बिभीषण देवकाते,किसन देवकाते , तानाजी देमुंडे, सौ ताई देवकाते , सौ अर्चना पालवे,सौ.प्रतिभा शेजाळ यांच्यासह मोठ्या प्रमाणात पालक ,ग्रामस्थ उपस्थित होते.वरील सर्व बाबींची खरेदी 25 सप्टेंबर रोजी एकत्रित करून 2 ऑक्टोबर नंतर मान्यवर अधिकाऱ्यांची वेळ घेऊन मोठया उत्साहात साहित्य शालार्पण कार्यक्रम घेण्याचे निश्चित करण्यात आले.