... देमनवाडीतील माजी विद्यार्थ्याची प्रतिक्रिया....👇
*देमनवाडीतील प्राथमिक शाळा राऊत सरांच्या मार्गदर्शनाखाली कात टाकत आहे*
*निसर्गप्रेमी सुरेश पालवे*
देमनवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अतिशय दुर्गम भागातील माळरानवरची ही शाळा. या देमनवाडीमध्ये कधीच एसटी येत नाही किंवा कधीच न्यूज पेपर भेटत नाही. देमनवाडीचा कर्जत तालुक्यातील घडामोडी मध्ये कधी उल्लेखकही होत नाही. कर्जत तालुक्यातील खूप कमी लोकांच्या परिचयाची असणारी ही देमनवाडी. एखाद्या शिक्षकाला शिक्षा द्यायची म्हणजे त्या शिक्षकाची बदली करून देमनवाडीला पाठवणे असा प्रकार समजला जायचा. पण कार्य करण्याची हिंमत, धमक व जिद्द आणि नाविन्याचा दृष्टिकोन असला की कोणतेही कार्य, कुठे गेले तरी खूप सहज आणि सोपे होऊन जाते. त्याचे एक उत्तम आदर्श उदाहरण म्हणजे देमनवाडी जिल्हा प्राथमिक शाळेतील राऊत सर व राऊत मॅडम.
आदरणीय राऊत सरांच्या मार्गदर्शनाखाली देमनवाडीतील प्राथमिक शाळा कात टाकत आहे. राऊत सर देमनवाडीतील मुलांना बदलत्या जागतिकीकरणाचे नवे धडे देत आहेत. ग्रामीण भागातील व दुर्गम भागातील ही मुले असली तरी त्यांची आधुनिकतेशी नाळ जुळवत आहेत. हे लहान लहान मुलं खरं तर त्यांना शिकवण म्हणजे तारेवरची कसरत असते. कष्टकरी, गोरगरीब व अठरा विश्व दारिद्र्य असणाऱ्या मुलांच्या आई-वडिलांकडे मुलांना लक्ष द्यायला वेळ नसतो. किंवा मुलांच्या आरोग्याची व शिक्षणाची त्यांना जास्त जाणीव नसते. या सर्वांमध्ये राऊत सरांनी वेगळेपणा जपला आहे. हे लहान मुलं कुठून येतात, त्यांच्या घरची परिस्थिती कशी आहे, त्यांचे आई वडील अडाणी आहेत का शिक्षित आहेत, या सर्व गोष्टींचा बारीक अभ्यास करून राऊत सर प्रत्येक मुलाला मायेने, आपुलकीने आणि जिव्हाळ्याने ज्ञानाचे अमृत पाजत आहेत, मुलांना विज्ञानवादी बनवत आहेत. त्यांना सुसंस्कारीक बनवीत आहेत. देमनवाडी मध्ये दळणवळणाची जास्त सोयी नसल्यामुळे येथील मुलं इंग्लिश शाळेमध्ये आई वडील घालू शकत नाहीत. किंवा काही कुटुंबांची तशी परिस्थिती नाही. मग ही मुलं अतिशय जलद धावत्या विज्ञान युगातील काळाशी स्पर्धा कशी करतील ? पण या चिंतेला राउत सारांनी पूर्णविराम दिला आहे.
मुलाचे पाय पाळण्यात दिसतात पण त्या मुलाला एक दिशा देण्याचे काम त्याचे गुरू करत असतात. मुलगा पुढे काय बनणार, कोण होणार, कोणत्या लेवला जाऊन पोहोचणार, हे सर्व त्याच्या प्राथमिक पायावरती म्हणजे प्राथमिक शिक्षणावर अवलंबून असते. तोच पाया राऊत सर अतिशय भक्कम मजबूत आणि उत्कृष्ट बनवत आहेत. जेव्हा देमनवाडी शाळेतील लहान लहान मुले इंग्लिशचे धडे वाचतात, लिहितात तेव्हा आम्हाला त्याचे कौतुक वाटते. लहान मुलांचे कॉम्प्युटरचे ज्ञान किंवा त्यांची गणिताची आकडेमोड पाहून राऊत सर या मुलांना भविष्यातील फक्त डॉक्टर, इंजिनिअरच बनविणार नाहीत, तर ही मुलं भविष्यामध्ये अतिशय मजबूत शैक्षणिक, राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि वैज्ञानिक क्षेत्रात भरीव योगदान देशासाठी देतील असे वाटते. कारण लहान मुले हे मातीच्या गोळ्याप्रमाणे असतात, त्यांना जसा आकार देतील, तसे ते घडत जातात. या लहान मुलांना उत्कृष्ट आकार देण्याचे काम राऊत सर करत आहेत. देमनवाडीतील शेतकऱ्याची मजुराची शेळ्या मागे फिरणारे किंवा ऊस तोडीवर जाणाऱ्या आई-वडिलांची मुलं असली तरी, आज या लहान मुलांना शास्त्रज्ञ होण्याची, IAS होण्याची व पायलट होण्याची स्वप्न पडत आहेत. याचे सर्व श्रेय राऊत सरांना जात आहे.
देमनवडीतील प्राथमिक शाळेमध्ये शिकणारी ही लहान मुलं, गोरगरिबांची मुलं, शेतकऱ्यांची मुलं, मेंढपाळाची मुलं व कामगारांची मुलं, इंग्लिश मीडियम मध्ये शिकणाऱ्या मुलांन इतकीच चाणक्ष व बुद्धिमान वाटतात. अशावेळी राऊत सरांचे आभार मानावे तेवढे कमीच आहे. गावातील गट तटाचे राजकारण असो. किंवा एकमेकांचे वैयक्तिक दुश्मनी असो या सगळ्यांपासून राऊत सरांनी प्राथमिक शाळेला अलिप्त ठेवल आहे आणि सर्वांबरोबर एक स्नेहाचे व जिव्हाळ्याचे संबंध जोपासले आहेत. देमनवाडीतील उद्योजक, सुशिक्षित आणि नोकरदार तरुणांना एकत्रित करून या शाळेचा विकास कसा करता येईल याचे नियोजन सर अतिशय उत्तम प्रकारे करत आहेत. वेगवेगळ्या स्वभावाची लोक, वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक, कसे हाताळायचे याचे उत्तम कौशल्य राउत सरांकडे आहे. ही शाळा माझी आहे या शाळेतील मुले माझे आहेत, या निस्वार्थ भावनेतून सरांनी या देमनवाडीतील प्राथमिक शाळेचे आपलेपण जपले आहे.
अतिशय दुर्गम भागातील माळरानावरती असणाऱ्या दमणवाडीचे सुदैव म्हणजे... या शाळेला आतापर्यंत खूप चांगल्या, प्रामाणिक व ग्रामीण भागातील मुलांविषयी तळमळ असणाऱ्या शिक्षकांची परंपरा लाभली आहे. मला आठवते त्याप्रमाणे मेडे गुरुजींनी देमनवाडी मध्ये आदर्श शिक्षणाचा पाया रचला. त्यानंतर अडसूळ सर, सरोदे सर, पवार सर, डहाळे सर व घोडके सर या शिक्षकांनी या पायावरती ज्ञान मंदिर व शिखर बांधून त्याच्यावरती यशाचा कळस चढविला आहे. अता राऊत सर व राउत मॅडम या जोडीने ह्या कळसावरती एक यशाचा, प्रगतीचा, आदर्शचा व गुणवत्तेचा झेंडा फडकविला आहे. शेळ्या- मेंढ्या, शेती आणि ऊस तोडीच्या पलीकडे येथील मुलांना शिक्षणाची काहीच किंमत माहित नव्हती. यांनी येथील मुलं घडवली शेळ्या मेंढ्या मागे, गाई म्हशी मागे फिरणारे मुले शाळेत आणली. त्यांना घडविले, वाढविले, ज्ञानाच अमृत पाजले, विज्ञानवादी विचाराचे बळ त्यांच्या पंखामध्ये भरले, महापुरुषांचे आदर्श त्यांच्या मनामध्ये रुजविले, स्वातंत्र्यवीरांचे, क्रांतिवीरांचे व देशभक्तीचे महत्व त्यांना सांगतले. आरोग्याचे महत्व खेळाचे महत्व व्यायामाचे महत्त्व त्यांना पटवून दिले . म्हणूनच आज देमनवाडीतील मुले विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्यकर्तुत्वाची चूक दाखवत आहे. शैक्षणिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र, इंजिनिअरिंग व IT क्षेत्र, प्रशासकीय क्षेत्र व उद्योजक क्षेत्रामध्ये आपलं कार्यकर्तृत्व सिद्ध करत आहेत. ह्या सगळ्या यशाचे श्रेय देमनवाडीतील प्राथमिक शाळेमध्ये मुलांना घडवणाऱ्या शिक्षकांना जाते.
देमनवाडी प्राथमिक शाळा ही फक्त शाळा नसून एक ज्ञानमंदिर झाले आहे. माळरानावरती चार भिंतीमध्ये सुरू झालेली ही शाळा, आज एक कुंजविहार प्रमाणे हसते खेळते निसर्गातील ज्ञानमंदिर तयार झाले आहे. या ज्ञान मंदिरात ही छोटी मुलं सुसंस्कारीक होत आहेत, सज्ञान होत आहेत, गुणवान होत आहेत, चाणक्ष व बुद्धिमान होत आहेत म्हणजे या मुलांचा सर्वांगीण विकास होत आहे. या सर्व गोष्टीचे श्रेय या घडीला तरी आदरणीय राऊत सरांना जात आहे. कारण त्यांचे निस्वार्थीपणे असणारे अखंड कष्ट व भारताचे भविष्य उज्वल होण्यासाठी नवीन पिढी घडवण्याची जिद्द आणि चिकाटी मुळे हे सर्व शक्य होत आहे....!
.
. *आपलाच एक माजी विद्यार्थी निसर्गप्रेमी सुरेश*