सारे शिकुया ,पुढे जाऊया , प्रगत महाराष्ट्र घडवूया


Saturday, 5 September 2015

सकट दाम्पत्यास सलाम

🔰शिक्षक दिन विशेष🔰
⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️
🈴सौजन्य-ॲडमीन पँनल महाराष्ट्र
👬👬👬👬👬👬👬

🌷संकलन-सोमवंशी तानाजी 9011104464🌷

🎯आजच राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित सकट दाम्पत्यांची कर्डेलवाडी शाळा
💐🌺🍂🍃🍁🌹🌷🌸

🔰⚠️🔰🎉🎋📱🔆🔅
कर्डेलवाडीत (जि. पुणे, ता. शिरूर) जिल्हा परिषदेची शाळा चालवणारे मुख्याध्यापक द. रा. सकट आणि त्यांची शिक्षिका-पत्नी बेबीनंदा. एकही सुटी न घेता वर्षातले ३६५ दिवस ही शाळा चालते. ‘ इथले विद्यार्थी केवळ ‘विद्यार्थी ’ राहू नयेत, तर ‘ज्ञानार्थी’ बनावेत,’ हा वसा सकट दांपत्यानं घेतला आहे.

गावातून शाळेकडं म्हणजे डाव्या बाजूनं जायच्या वाटेवर ठिकठिकाणी फलक होते. काही ठिकाणच्या भिंतीही रंगल्या होत्या. गावाचं आणि शाळेचं कर्तृत्व सांगणारी चिन्हं या फलकांवर दिसत होती. गावाला जे जे पुरस्कार मिळाले, ते ते भिंतीवर अवतरले होते. प्रत्येक पुरस्कारात शाळेचा खारीचा किंवा भारीचा वाटा होताच होता. दोन गल्ल्यांच्या बेचक्‍यात अडकलेला रस्ता पार करत आम्ही अशा एका ठिकाणी पोचलो, की जिथं हजारभर लोकवस्तीचं गाव संपलेलं असावं. झाडात लपलेली एक शाळा दिसत होती आणि शाळेवर बोर्ड झळकत होता ‘जि. प. प्राथमिक शाळा, कर्डेलवाडी...’ शाळेच्या व्हरांड्यात पोरं-पोरी रिंगण करून बसले होते. इंग्रजीचा पाठ वाचत पाठ करत ही बच्चेकंपनी बसली होती. बहुतेक ती पहिलीतली किंवा त्याच्याही खालच्या वर्गातली असावीत. सारी पोरं गणवेशात होती. प्रत्येकाच्या डोक्‍यावर गांधीबाबाची टोपी होती. राजकारण्यांनी ही टोपी बऱ्यापैकी बदनाम करून टाकलीय! त्यातून ‘टोपी घालणं’ हा शब्दप्रयोग जन्माला आलाय. रयत शिक्षण संस्थेनंतर बहुधा या शाळेतच मी अशी टोपी पाहिली. स्वच्छ, टोकदार आणि ३०-३५ रुपयांना मिळणारी ही टोपी.
मुलांच्या रिंगणाजवळ बसून एका पोराला प्रश्‍न विचारला ः ‘‘तुझं नाव काय?’’
तो म्हणाला ः ‘‘माझं खरं नाव सोहम आणि खोटं नाव संभू.’’
मग असाच प्रश्‍न एका मुलीला विचारला.
ती म्हणाली ः ‘‘माझं खरं नाव भक्ती.’’
खोटं नाव सांगताना ती किंचित अडखळली. मग असाच प्रश्‍न अन्य एका पोराला विचारला.
तोपर्यंत ती मुलगी म्हणाली ः ‘‘माझं खोटं नाव सोनू.’’ मग मुलगा म्हणाला, ‘‘माझं खरं नाव मंगेश.’’ त्यानं खोटं नाव नाही सांगितलं.
प्रत्येक विद्यार्थ्याला दोन नावं होती. एक शाळेतलं ते खरं आणि शाळेबाहेरचं दुसरं नाव खोटं... गंमत अशी, की दोन्ही नावं चालत होती.
बोलता बोलता पोरांच्या स्वप्नांना हात घातला. वेंकटेश हा डॉक्‍टर, तर वैभव हा सैनिक होणार आहे. प्राजक्ता ही शेतकरी होणार आहे. डॉक्‍टर-शिक्षक होणारी अनेक पोरं होती आणि शेतकरी होणारीही होती. बहुतेक ‘उत्तम शेती...’, हे वाक्‍य त्यांच्याकडून पाठ करून घेतलेलं असावं.
मी ज्या गोष्टीसाठी इथं आलो होतो तो प्रश्‍न विचारला. ‘शाळा किती दिवस चालते?’ त्याचं उत्तर साहिलनं दिलं. वर्षभर. अगदी रविवारीसुद्धा.
या शाळेत मुख्याध्यापक आहेत द. रा. सकट (९८२२९५६२०६). त्यांच्या पत्नी बेबीनंदा शिक्षिका आहेत. दोनशिक्षकी शाळा आहे; पण विद्यार्थिसंख्या वाढल्यानं नीलोफर समीर तांबोळी ही आणखी एक शिक्षिका नव्यानं दाखल झाली आहे.

देशभरात आणि देशाबाहेर गाजलेली शाळा मी पाहत होतो. चौथीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होती. बाकीचे तीन-चार वर्ग सुरू होते. दोन शिक्षिका अधूनमधून प्रत्येक वर्गावर जायच्या. मुलं काय करतात ते पाहायच्या. एका वर्गात मुलांची सतत नजर पडेल एवढ्या अंतरावर समानार्थी शब्दांचे फलक टांगलेले होते. भिंतीवर वेगवेगळे तक्ते होते. शेजारच्या वर्गात काही पोरं जोरजोरात सात रंग इंग्रजीतून पाठ करत होतं. संगणकाच्या लॅबमध्येही एक वर्ग सुरू होता. तिथंही इंग्रजीतूनच अभ्यास सुरू होता. एक विद्यार्थी म्हणायचा ः ‘दात घासण्यासाठी मी वापरतो.........’ दुसरी पोरं म्हणायची ः ‘ब्रश... ’ एक लक्षात आलं, की बाहेर जे चौथीच्या पोरांना येतं, ते इथं पहिलीच्याही पोरांना येतं. मराठी-इंग्रजी फाडफाड बोलतात इथं पोरं... त्यांची अक्षरं भुरळ घालणारी आहेत. मनोज आणि गोकुळ मध्येच काहीतरी प्रयोग करायचे. चार-चार वाक्‍यं बोलायचे आणि ती वाक्‍यं विद्यार्थ्यांना लिहायला सांगायचे. पोरं अचूक लिहायची. सुंदर अक्षर, शुद्ध भाषा, प्रमाण मराठी आणि यामागं प्रचंड विश्‍वास... आपण चुकतो अशी भावनाच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसायची नाही....

आज गॅस संपलेला होता म्हणून खिचडी शिजणार नव्हती. सरकार खिचडीचा आग्रह धरतं; पण जळण कुठून आणायचा, याचा विचार करत नाही. बाहेरगावाहून आलेल्या पोरांनी त्यांचा डबा खाल्ला. स्थानिक पोरांनी घरी जाऊन पोटात काहीतरी ढकललं.

शाळेत सर्वत्र शैक्षणिक वातावरण पसरलंय. कुठंही नजर टाका, काहीतरी शिकायलाच मिळतं. शाळेत कायद्यानं राबवायचे प्रकल्प आहेत. त्याच्या सर्व फायली नीटनेटक्‍या होत्या. शालेय रेकॉर्डच्या १०१ फायली सलग वाचता येत होत्या. स्त्रीभ्रूणहत्येविरुद्धची पोस्टर लागलेली होती. संगणक लॅब पूर्ण एसी होती. शाळेत ग्रंथालय होतं; पण त्यातली पुस्तकं जाणीवपूर्वक खरेदी केलेली आणि जीवनाभिमुख होती. कसलाही ताणतणाव नाही. छड्या फिरवणं नाही. चिडचिड नाही. शांतपणे सारं काही चाललेलं. वेगळंच वातावरण, जे शिकण्यासाठी आवश्‍यक असतं, तेच जाणीवपूर्वक जन्माला घातलेलं. अशा वातावरणात मुलांचा बुद्‌ध्यंक वाढत गेला. गळती कमी होत गेली. शिष्यवृत्ती परीक्षेत इथली पोरं राज्यात-जिल्ह्यात चमकू लागली. शिकणं आनंददायी असतं, हे पोरांना कळू लागलं. ४० ते ५० टक्के मतिमंद असलेला पोरगाही नॉर्मल पोरांच्या इतका धावू लागला. जी शाळा बंद पडण्याच्या अवस्थेत होती, तिथं प्रवेशासाठी गर्दी होऊ लागली. बाहेरगावाहून मुलं येऊ लागली. एकेकाळी भकास वाटणारी शाळा बघता बघता सुंदर रूप घेऊन उभी राहिली.  मोजता येत नाहीत इतके पुरस्कार या शाळेला मिळाले. ती एक मॉडेल झाली. अनेकांनी भेटी दिल्या. कलेक्‍टर, सीईओ, पदाधिकारी... साऱ्यासाऱ्यांनी भेटी दिल्या. मुख्याध्यापकांनाही पुरस्कार दिले. शाळेला कुणी संगणक दिला, कुणी एसी दिला, कुणी सोलर एनर्जीचा सेट दिला, कुणी पाणी शुद्ध करण्याची व्यवस्था दिली. या शाळेतून बाहेर पडणारी बहुतेक मुलं पुढं विज्ञान आणि अभियांत्रिकीला गेली. तिथंही गळतीचं प्रमाण कमी आहे.
मुख्याध्यापक सकट आपल्या आदर्श शाळेचा प्रयोग घेऊन महाराष्ट्रभर फिरले.


हा संपुर्ण लेख वाचण्यासाठी तसेच इतर वाचनीय लेख तथा सर्व शैक्षणिक माहितीसाठी क्लिक करा.

http://tanajisomwanshi.blogspot.in/p/blog-page_44.html?m=1

🙏साभार- दै.सकाळमधील "फिरस्ती"मधील संपादक उत्तम कांबळे यांचा लेख🙏

No comments:

Post a Comment